Saturday 25 April 2020

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त
लेखमाला
भाग१
महामानव महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
    डॉ.हनुमंत भोपाळे
काळ जेव्हा जनतेच्या मूळावर येतो तेव्हा या काळाला दूर करण्यासाठी जीवाची पर्वा न करता जी माणसं माणसांच्या हितासाठी समोर येतात, आयुष्यभर वेदना सहन करत परिश्रम घेतात, त्यांना महापुरुष, महात्मे म्हणून सज्जनाकडून गौरव होतो.महात्मा बसवेश्वर
हे महात्मा, महापुरुषच.त्यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने लेखमाला सुरू करून अभिवादन करीत आहे.
    चुकीचे विचार आणि आचार पेरून जनतेच्या मनाला गुलाम करून आपली पोळी भाजून घेणारी टोळी जगात सर्वत्र उदयाला येत राहते.आजही त्या टोळ्या आहेत.
कोरोनाचं संकट दूर होईल पण ह्या टोळ्या संपणार नाहीत,असाच हजारो वर्षांपासूनचा समाजाचा अनुभव आहे.
भय, खोटारडेपणा आणि स्वार्थ या तीन प्रमुख शस्त्रांचा उपयोग करून मानवानेच मानवाला पिळले,छळले,गुलाम केले.ही गुलामी विविध प्रकारची आहे.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजाला मानसिक, धार्मिक, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत परिश्रम घेतले.हे परिश्रम घेताना मानवतेच्या शत्रूकडून विलक्षण त्रास सहन केला.
जात ही मानव निर्मित बाब असून यातील श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा भाग काल्पनिक, अवैज्ञानिक,असत्य आहे.
मानव जन्माला आला, याला लाखों वर्षाचा इतिहास आहे. हजारो वर्षे विवाह संस्था नव्हती.विवाह नसल्याने
कुटुंबसंस्था नव्हती.जाती संस्था, धर्मसंस्था नव्हती.
आमचं रक्त श्रेष्ठ म्हणून आपण श्रेष्ठ आणि तुमचं रक्त कनिष्ठ म्हणून तुम्ही कनिष्ठ असल्या फालतू भेदाचा
प्रकारच नव्हता.पशूपक्षी  आपली प्रजा निर्माण करतात तशीच मानव आपली प्रजा निर्माण करत होता.
जातीसंस्था,वर्णसंस्था आणि त्यातील मानव निर्मित विषमतेची विषारी उतरंड नव्हती.
हे विष निर्माण होण्यास भारतातील विवाह संस्था मुख्य कारणीभूत आहे.पुढे व्यवसायामुळेही जाती निर्माण केल्या.हा व्यवसाय श्रेष्ठ आणि हा व्यवसाय कनिष्ठ सांगण्याच्या नादात अमूक व्यवसाय करणारे कनिष्ठ जातीचे आणि तमूक व्यवसाय करणारे श्रेष्ठ जातीचे अशी विकृत विभागणी करण्यात आली.काही समूहाला
अस्पृश्य समजून त्यांना दूर ठेवले.गावाबाहेरही ठेवले.याचा अर्थ गाव आणि गावकुसाबाहेरचे एवढीच विभागणी म्हणून गावातले श्रेष्ठ आणि गावकुसाबाहेरचे
कनिष्ठ इतकंच नव्हतं.गावातही वेगवेगळ्या विषमतेच्या भिंती तशा गावकुसाबाहेर राहणा-यामध्येही विषमतेच्या भिंती निर्माण करण्यात आल्या.ही विषमतेची विषारी निर्मिती एकदुकट्या समूहाचे कामं नव्हे!कमी अधिक प्रमाणात अनेकांनी हे काम केले आहे.यामागे अज्ञानही होतंच!
याचे विघातक, विध्वंसक परिणाम वेगवेगळ्या समूहाला सहन करावे लागू लागले.काहीजणांचं यात हित होतं,जे स्वत:ला श्रेष्ठ मानून जगत होते.पिळवणूक करत होते.
अन्यायकारक अशा व्यवस्थेतही आपलं हित आहे मग
या विषारी व्यवस्थेला जतन करून आपला स्वार्थ घेण्यासाठी काही समूहानं जीवाचं रान केले.
भाकड कथा निर्माण करून जात,वर्ण,धर्म आदी भेद
देवानेच निर्माण केले आहेत.धर्मातलं सगळंच काही
नाशकारक नसते पण नासकंही
पाळणं म्हणजे देवाची आज्ञा पाळणे होय.जी व्यवस्था सध्या आहे त्या किती अव्यवस्थित वाटत असेल,त्रास होत असेल तरी तुम्ही देवाची इच्छा म्हणून ते सहन करा.
सहन करत असताना आहे त्याच अवस्थेत देवाचं नामस्मरण करा पुढच्या जन्मी तुम्ही श्रेष्ठ जातीत येणार आहात, असं भलंमोठं काल्पनिक गाजरं दाखविण्यात आले. काहीजण या काल्पनिक गाजरच्या 🥕 च्या ओढीने नामस्मरण घेत
जगत होते. आजही काही जण जगतात.
पुढे आणखी एक पिल्लू सोडण्यात आले की,
तुम्हाला ही जी अवस्था वाट्याला आली आहे, याचं कारण तुम्ही मागच्या जन्मी पाप केले आहे.
यातून  सुटका व्हावी असे वाटत असेल तर  जन्मी
 जे काही वाट्याला आले आहे ते सहन करत, नामस्मरण घ्या अशी थाप मारण्यात आली.'आज नगद कल उधार' ही जशी फसवी जाहिरात करतात,तशी ती  फसवी जाहिरात होती.या जाहिरातीला समाज बळी
पडत  आहे,हे अत्यंत अन्यायकारक आहे,याची जाणीव अनेक महापुरुषांनी, संतांनी करून दिली, त्यांचेही छळ करण्यात आले.छळ करणारे आपला स्वार्थ साधण्यासाठी विषमतावादी व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी
विषारी दलालींनी
वेळप्रसंगी काही संत, महापुरुष, विचारवंत याची हत्या केली. अनेकांनी विषमतेचे विष कमी करण्यासाठी प्रयत्न केले.तरीही  बाराव्या शतकातही ही व्यवस्था टिकून होती.या व्यवस्थेतील विष
महात्मा बसवेश्वर यांनी उतरविण्यासाठी ते रणांगणात उतरले. त्यांनी दिलेले विचार आणि कार्य

पुढील भागात वाचा.......
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com
ब्लागला भेट देण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://drhanumantbhopalesir.blogspot.com

No comments:

Post a Comment