Sunday 26 April 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं बरं नव्हे!
  डॉ हनुमंत भोपाळे
माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सध्या महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाच्या संकटातून सोडविण्यासाठी व्यस्त आहेत.अशा परिस्थितीत त्यांना त्या पदावरून दूर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही.
खरं तर कोरोनारूपी  विश्र्वाला जीव घेणारं संकट आहे.जागतिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे.आपल्याकडे निवडणूक आयोगाने निवडणूका पुढे ढकल्या आहेत.अशा परिस्थितीत माननीय श्री.उध्दव ठाकरे स्वत:चं निवडणूक कार्यक्रम जाहीर करून
विधानसभेवर जाऊ शकत नाहीत.
सहा महिन्यांच्या आत त्यांनी विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य होणे गरजेचे आहे, हे मान्य आहे पण निवडणूक झाली नाही तर काय करायचे, यासंबंधी कायदा काही सांगत नसेल तर अशा परिस्थितीत सद्सदविवेकबुध्दीचा वापर करून , परिस्थितीचे गांभीर्य ओळखून न्याय असा निर्णय घेणे अपेक्षित असते.
जनमत तर उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहे.आज जरी निवडणूक घेतली तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते.
असे असताना काहीजणांनी विकृत,सुडबुध्दीचे राजकारण सुरू केले आहे.
तुम्ही राजकारण अवश्य करा
पण ही ती वेळ नव्हे!
उलट सर्वपक्षांनी माननीय राज्यपाल महोदयांना विनंती केली पाहिजे,आमची मातृभूमी,आमचा महाराष्ट्र संकटात आहे.आपला विशेष अधिकार वापरून
माननीय उध्दव ठाकरे यांना विधानपरिषदेवर सदस्य म्हणून  महाविकास आघाडीने विनंती केली आहे ती मान्य करा असे सांगितले पाहिजे.
यामुळे महाराष्ट्रातील जनतेत एक सकारात्मक संदेश जाईल.
माननीय उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्याचं  षंढयंत्र खरंच अन्यायकारक आहे.
विद्यार्थ्यांची पदवी परीक्षा न घेताच
तुम्ही पदवी पास झाल्याचे प्रमाणपत्र सादर करा म्हणणं जितके अन्यायकारक आहे,त्याही अधिक अन्यायकारक
माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधानसभेत
निवडून या असे सांगणे होय.
उध्दव ठाकरे तांत्रिक अडचणीत सापडतील अन् त्यांचं मुख्यमंत्री पद जाईल म्हणणा-यांनी कोरोनामुळे कायदाचं अडचणीत सापडला आहे,असा का विचार करू नये?
सत्तेसाठी माणसं कोणत्याही थराला जातील पण
जनता अशा कठिण परिस्थितीत केलेल्या माकडचेष्टा सहन करणार नाही.
बरं,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केल्याने तुम्ही थोडेच मुख्यमंत्री होणार आहात?
असं काही होणार नाही, उलट परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मा. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कायदेशीर पेच सोडविणे शहाणपणाचे ठरेल.
हा विषय न्यायालयात गेला तर न्याय
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच मिळणार आहे.
उध्दव ठाकरे न्यायालयाला विचारू शकतात
मला निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध करून न देताच मला अपात्र कसे काय ठरवणार आहात?
मा.न्यायालय नक्कीच सकारात्मक निर्णय देऊ शकते.
डॉ. हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

Saturday 25 April 2020

महापुरुषांच्या विचार आणि कार्याचे विस्मरण झाले तर केवळ प्रतिमा शिल्लक राहतात
                  -डॉ.हनुमंत भोपाळे

प्रत्येक महापुरुषांना,संताना, समाजसुधारकांना अनुयायी,भक्त लाभलेलं आहेत.नामभक्तीसाठी भक्त जीवाचा आटापिटा करतात.नामस्मरण,नमन करण्यासाठी वेळ देतात.घरात विशिष्ट जागा देऊन मोठमोठ्या प्रतिमा लावतात.वंदन करून दिवसांची सुरूवात करतात.आपली ज्यांवर श्रद्धा आहे,त्यांचे मंदिर बांधण्यासाठी तनमनधनाने प्रयत्न केले जातात.नामभक्तीत भक्तांना समाधान वाटते.समाधान देणारी भक्ती निश्चितच उपकारक आहे,यात काही शंका नाही.आपली जिथे श्रद्धा असते तिथे आपल्याला आनंद, समाधान मिळते, असे समाधान कुणालाही मिळत नाही.पण अनेकांचा आग्रह असतो की, आम्ही भक्त आहोत, तुम्हीही भक्त बना.आमच्यासारखं तुम्हीही नामस्मरण करा.तुम्हाला समाधान मिळेल..तुम्ही भक्त आहात हे लक्षात आले की, काही ना काही सहकार्य मिळते,आपली उन्नती होण्यास मदत होते.हा सरळ हिताचा विचार मांडला जातो.
काही जणांना वाटते की, आम्ही नामस्मरण,
नामभक्तीपेक्षा त्या महापुरुषांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्यासाठी तन्मयतेने काम करू.तनमनधनाने यथाशक्ती योगदान देऊ .नामातून नाही तर कामातून श्रद्धा व्यक्त करू.  कार्यातून श्रद्धा व्यक्त करण्यात निश्चितच समाजाचा फायदा आहे.त्या महापुरुषाला अभिप्रेत असणारा समाज निर्माण होत असेल तर हे खरे स्मरण ठरेल.  पण केवळ भक्तीत दंग राहणार असू तर विचार आणि कार्याला समोर नेण्यासाठी कोण समोर येईल ?विचार आणि कार्याचे विस्मरण झाले तर केवळ प्रतिमा शिल्लक राहतात.पुढची पिढी यांनी काय केले,आज त्यांचा उपयोग काय ?  भक्तांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला जातो
 तेव्हा काय उत्तर द्यायचे हा  प्रश्न पडतो.आजही अनेक जुन्या प्रतिमा नजरेसमोर येतात.समाधी, मंदिर दिसतात.त्यांच्या कार्याचा इतिहास आजच्या भक्तांना सांगता येत नाही. आमचे पूर्वज पूजत होते म्हणून आम्ही पूजतो.भक्ती करतो.नाही केले तर नको ते घडेल.लोक नावं ठेवतील म्हणून नामस्मरण घेतो,असं अंधभक्त सांगतात.हा धोका ओळखून महापुरुषांचे चरित्र लेखन केले पाहिजे, ते चरित्र देवघरात न ठेवता जनमानसात गेले पाहिजे, यासाठी योगदान देणारी माणसं आहेत.काहीजन त्यांनी केलेले कार्य  समाजाला लाभ मिळवून देतात.मग जग इतिहासात नोंद घेते की, ह्या ह्या महापुरुषांनी  असंख्य कर्तबगार माणसं निर्माण केली.एखाद्या माणसांचे मोठपण त्यांनी समाजाला मोठं करणारी किती माणसं मोठं केली,यात असते.कोणाला मोठं केलं,हेही समाजासमोर आले तर योगदानाची नोंद
होते हा संदेश जाणे प्रेरक ठरेल.
डॉ.हनुमंत भोपाळे 9767704604
hanumantbhopale@gmail.com
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त
लेखमाला
भाग१
महामानव महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
    डॉ.हनुमंत भोपाळे
काळ जेव्हा जनतेच्या मूळावर येतो तेव्हा या काळाला दूर करण्यासाठी जीवाची पर्वा न करता जी माणसं माणसांच्या हितासाठी समोर येतात, आयुष्यभर वेदना सहन करत परिश्रम घेतात, त्यांना महापुरुष, महात्मे म्हणून सज्जनाकडून गौरव होतो.महात्मा बसवेश्वर
हे महात्मा, महापुरुषच.त्यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने लेखमाला सुरू करून अभिवादन करीत आहे.
    चुकीचे विचार आणि आचार पेरून जनतेच्या मनाला गुलाम करून आपली पोळी भाजून घेणारी टोळी जगात सर्वत्र उदयाला येत राहते.आजही त्या टोळ्या आहेत.
कोरोनाचं संकट दूर होईल पण ह्या टोळ्या संपणार नाहीत,असाच हजारो वर्षांपासूनचा समाजाचा अनुभव आहे.
भय, खोटारडेपणा आणि स्वार्थ या तीन प्रमुख शस्त्रांचा उपयोग करून मानवानेच मानवाला पिळले,छळले,गुलाम केले.ही गुलामी विविध प्रकारची आहे.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजाला मानसिक, धार्मिक, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत परिश्रम घेतले.हे परिश्रम घेताना मानवतेच्या शत्रूकडून विलक्षण त्रास सहन केला.
जात ही मानव निर्मित बाब असून यातील श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा भाग काल्पनिक, अवैज्ञानिक,असत्य आहे.
मानव जन्माला आला, याला लाखों वर्षाचा इतिहास आहे. हजारो वर्षे विवाह संस्था नव्हती.विवाह नसल्याने
कुटुंबसंस्था नव्हती.जाती संस्था, धर्मसंस्था नव्हती.
आमचं रक्त श्रेष्ठ म्हणून आपण श्रेष्ठ आणि तुमचं रक्त कनिष्ठ म्हणून तुम्ही कनिष्ठ असल्या फालतू भेदाचा
प्रकारच नव्हता.पशूपक्षी  आपली प्रजा निर्माण करतात तशीच मानव आपली प्रजा निर्माण करत होता.
जातीसंस्था,वर्णसंस्था आणि त्यातील मानव निर्मित विषमतेची विषारी उतरंड नव्हती.
हे विष निर्माण होण्यास भारतातील विवाह संस्था मुख्य कारणीभूत आहे.पुढे व्यवसायामुळेही जाती निर्माण केल्या.हा व्यवसाय श्रेष्ठ आणि हा व्यवसाय कनिष्ठ सांगण्याच्या नादात अमूक व्यवसाय करणारे कनिष्ठ जातीचे आणि तमूक व्यवसाय करणारे श्रेष्ठ जातीचे अशी विकृत विभागणी करण्यात आली.काही समूहाला
अस्पृश्य समजून त्यांना दूर ठेवले.गावाबाहेरही ठेवले.याचा अर्थ गाव आणि गावकुसाबाहेरचे एवढीच विभागणी म्हणून गावातले श्रेष्ठ आणि गावकुसाबाहेरचे
कनिष्ठ इतकंच नव्हतं.गावातही वेगवेगळ्या विषमतेच्या भिंती तशा गावकुसाबाहेर राहणा-यामध्येही विषमतेच्या भिंती निर्माण करण्यात आल्या.ही विषमतेची विषारी निर्मिती एकदुकट्या समूहाचे कामं नव्हे!कमी अधिक प्रमाणात अनेकांनी हे काम केले आहे.यामागे अज्ञानही होतंच!
याचे विघातक, विध्वंसक परिणाम वेगवेगळ्या समूहाला सहन करावे लागू लागले.काहीजणांचं यात हित होतं,जे स्वत:ला श्रेष्ठ मानून जगत होते.पिळवणूक करत होते.
अन्यायकारक अशा व्यवस्थेतही आपलं हित आहे मग
या विषारी व्यवस्थेला जतन करून आपला स्वार्थ घेण्यासाठी काही समूहानं जीवाचं रान केले.
भाकड कथा निर्माण करून जात,वर्ण,धर्म आदी भेद
देवानेच निर्माण केले आहेत.धर्मातलं सगळंच काही
नाशकारक नसते पण नासकंही
पाळणं म्हणजे देवाची आज्ञा पाळणे होय.जी व्यवस्था सध्या आहे त्या किती अव्यवस्थित वाटत असेल,त्रास होत असेल तरी तुम्ही देवाची इच्छा म्हणून ते सहन करा.
सहन करत असताना आहे त्याच अवस्थेत देवाचं नामस्मरण करा पुढच्या जन्मी तुम्ही श्रेष्ठ जातीत येणार आहात, असं भलंमोठं काल्पनिक गाजरं दाखविण्यात आले. काहीजण या काल्पनिक गाजरच्या 🥕 च्या ओढीने नामस्मरण घेत
जगत होते. आजही काही जण जगतात.
पुढे आणखी एक पिल्लू सोडण्यात आले की,
तुम्हाला ही जी अवस्था वाट्याला आली आहे, याचं कारण तुम्ही मागच्या जन्मी पाप केले आहे.
यातून  सुटका व्हावी असे वाटत असेल तर  जन्मी
 जे काही वाट्याला आले आहे ते सहन करत, नामस्मरण घ्या अशी थाप मारण्यात आली.'आज नगद कल उधार' ही जशी फसवी जाहिरात करतात,तशी ती  फसवी जाहिरात होती.या जाहिरातीला समाज बळी
पडत  आहे,हे अत्यंत अन्यायकारक आहे,याची जाणीव अनेक महापुरुषांनी, संतांनी करून दिली, त्यांचेही छळ करण्यात आले.छळ करणारे आपला स्वार्थ साधण्यासाठी विषमतावादी व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी
विषारी दलालींनी
वेळप्रसंगी काही संत, महापुरुष, विचारवंत याची हत्या केली. अनेकांनी विषमतेचे विष कमी करण्यासाठी प्रयत्न केले.तरीही  बाराव्या शतकातही ही व्यवस्था टिकून होती.या व्यवस्थेतील विष
महात्मा बसवेश्वर यांनी उतरविण्यासाठी ते रणांगणात उतरले. त्यांनी दिलेले विचार आणि कार्य

पुढील भागात वाचा.......
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com
ब्लागला भेट देण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://drhanumantbhopalesir.blogspot.com

Tuesday 21 April 2020

जिने
तुला जगात
प्रवेश दिला
विटाळामुळेच तुझा जन्म झाला.
विटाळाला तू टाळतो आहेस
तू कुठला धर्म पाळतो आहेस ?
जिनं तुला वाढवलं
घडवलं
जीवनात तुला उभं केलं
ती कुठे उभी आहे?
मंदिराची अन् तिची अजूनही
कट्टीबट्टी आहे.
ही कटीबटी कुणी केली ?
मानवतेलाच सुट्टी कुणी दिली?
जनावरांनाही कळत असावं
विषमतेचे विष त्यांच्या  ध्यानीमनी नसावं
त्यांना  वाजवता येतं नसतील टाळं
म्हणूनच  ते मानत नसतील विटाळ
समतेची ओरडून गाता येत नसतील गाणी
पण त्यांना एकाच तळ्यातलं चालते पाणी
त्यांचे आश्रम नाहीत
वृध्दाश्रमही नाहीत
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

Monday 20 April 2020

खरंच साहित्यक जास्त  झाले आहेत का?
 ग्रंथांना मागणी वाढत नाही का ?
डॉ हनुमंत भोपाळे




'लेखन करणाऱ्यांचा सुकाळ झालाय,दगड काढला
की विंचू दिसावा तसे कवी , साहित्यिक दिसत आहेत' असे एक जण म्हणाला.
त्याला म्हणालो,"असं तुम्ही लिहा"
तो म्हणाला,"मी काही लेखक नाही हो"
जे बोलत आहात तेच लिहा
असे म्हणल्यावर त्याचं म्हणणं होतं की,नका
कशाला ?
टीका होते.
मी म्हणालो," लिहिल्याने टीका होते म्हणून  भीती वाटते
तर मग बोलल्याने टीका होतेच की"?यावर
तो गप्प बसला?
त्याला विचारलो,
'बरं तुम्हाला या लिहि-याकडून काही त्रास आहे का ?'
तो म्हणाला, "त्रास नाही पण
त्याचे पेपरात नाव छापून येतात, लयी मिरवतात"
'म्हणजे तुम्हाला त्यांचा नावलौकिक तुम्हाला सहन होत नाही का'?
यावर तो म्हणाला," मला आता कशाला लिहियाचं
पूर्वीच खूप लिहून ठेवले आहे तेच वाचा म्हणावं ना?
साहित्य कोण वाचते सध्या?
आता सोशल मीडिया आहे.खंडीभर वाहिन्या झाल्यात.
साहित्याला कोण विचारते?
असे विजयी स्वरात म्हणाला.
तुम्हाला साहित्य म्हणजे काय माहित आहे? असे विचारल्यावर तो म्हणाला,
"साहित्यिक लिहितात ते साहित्य.
या साहित्याला सध्या तरी काही किंमत नाही.
स्वत:चे पैसे टाकायचे आणि छापून आणायचं
असला प्रकार चालू आहे" ?

त्यांचे पैसे खर्च करून छापून आणत असतील, तुम्हाला काय अडचण आहे?
असे विचारल्यावर
त्यांचं म्हणणं होतं की,
"आणून घरातच ठेवून कुठे बसतात
ते कुणालाही भेट देत फिरतात
फेसबुकवर टाकतात
ते मला आवडत नाही. पाहवत नाही"

तुम्ही फोटो टाकत असता ना?
तुमच्या फोटोचा त्रास इतरांना होत नाही का?
असे विचारल्यावर तो म्हणाला,"
आमचे फोटो साहित्यिक सारखं नसतात.
पुस्तक देताना,भाषण देताना
असला प्रकार  आमचा नसतो."
मग कसला असतो? मी विचारलो
तो म्हणाला,"
आम्ही हाँटेलमध्ये जेवण करताना,
गाडी चालवताना, मित्रांसोबत भेटल्यावर,
लेकरासोबत खेळतानाचे आमचे फोटो अपलोड केलेले असतात."
या फोटोचा त्रास होत असेल की कुणाला?
त्याचं म्हणणं होतं की
'आमच्या फोटोत त्रास होईल असे काही नसते.'

साहित्यिकांच्या फोटोत काय त्रास होण्यासारखं असते?
असे विचारल्यावर तो म्हणाला,"
तसला नाटकीपणा मला आवडत नाही.
साहित्यिकाचे फोटो नाटकी असतात.
आमचे फोटो सोज्वळ असतात.'

बरं तुम्ही म्हणालात ,'सोशील मिडिया
चित्रपटाला सध्या महत्त्व आहे.
साहित्याला काही  किमंत नाही
तुम्हाला माहिती आहे का
चित्रपट हे कुणी तरी लिहिलेल्या
साहित्यावर असतात.
विनोद सुध्दा साहित्य आहे.
सोशल मिडीयावर येणारे जोक्स, विनोदी किस्से,गाणे, सुविचार
हे पण साहित्य आहे.सोशील मिडियामुळे
साहित्य जास्त वाचलं जात आहे.
पुस्तकं वाचलं म्हणजे साहित्य वाचले असे कशाला समजायचे.
उलट आज इंटरनेटवर  साहित्य सहज उपलब्ध आहे.
आठवल की वाचक शोधून वाचत आहे.
लाखो पुस्तक एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
अनेक साहित्यकृतीला , ई-बुक्सला इंटरनेटवरून मागणी आहे.
मुद्रित स्वरूपात आलेले पुस्तक रोज खरेदी केले जात आहेत.
मला सांगा पुस्तकाचे दुकान,ग्रंथालय,ई- ग्रंथालय
वाढतच आहेत ना?
कोट्यवधी माणसं रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून साहित्याचा आस्वाद घेत आहेत.'
असे म्हणल्यावर तो म्हणाला",हेही खरे आहे."

 वाईट व्यसनाचे प्रमाण वाढत आहे, दहशतवादी वाढत आहेत याबद्दल काही बोलत नाही.
असे विचारल्यावर तो म्हणाला"
ते लोक बरे नसतात
कशाला बोलू
आ बैल मुझे मार
मज्यानं होतं नाही."
त्यांना विचारलो,
आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे?
त्यांने सांगितले,एकशे पस्तिस कोटीच्यावर आहे?
साहित्यिक किती आहेत?
चार दोन कोटी आहेत का?
यावर तो म्हणाला,'
नाही तेवढही नाहीत.
लाखामागं एखादा असेल.
नाही तुम्हीच म्हणालात की
'दगड उचलला की, साहित्यिक सापडलाय'?
बरं तुम्ही शिकलात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात
त्यांना भाषेच्या पुस्तकात कथा कविता, लेख
असतात.साहित्य माणसांवर संस्कार करते.
संस्काराशिवाय विकार दूर होत नसतात.
साहित्य मनोरंजन करते
ज्ञान देते.
साहित्य म्हणजे त्या त्या राष्ट्राचे वैभव असते.
साहित्य म्हणजे समाजाचं होकायंत्र
अनेक धोकांच्या जाणीव करून देते.
साहित्यामुळे वैचारिक, बौद्धिक मानसिक भूकच नाही तर अनेकांच्या पोटाची भूक भागवते.
अनेक नाट्य, चित्रपट,मालिकेचे कलावंत साहित्यावर उदरनिर्वाह करतात.
साहित्य फार विशाल आणि प्राचीन आहे.
हजारो वर्षांपासून अक्षर स्वरूपाचे लोकवाड्मय निरक्षर
माणसांनी निर्माण केले,जतन केले.
कितीही सांगितलं तितकं कमीच आहे
साहित्याचे महात्म्य.
जगाचं वैर घेऊन,खस्ता खाऊन लेखन करतात
झोप मोड करून लिहतात.
पदरमोड छापून आणतात.
याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं नसेल तर करू नको
किमान कृतघ्नपणा तरी नको.'
तेव्हा तो खाली मान घालून म्हणाला,
"जाऊ द्या हो आता"
काल एका साहित्यिकाला गाडी मागल्यानं
त्यानं दिला नाही.
 तो म्हणाला,
"दिलो असतो पण कविसंमेलनाला चाललो"
म्हणून मला साहित्यिक लोकांचा राग आला.
मला वाटलं हा जर साहित्यिक नसला असता तर मला गाडी मिळाली असती?"
असे म्हणून निघून गेला.

डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com

Sunday 19 April 2020

सद्सदविवेकबुध्दीचा वापर करून केलेली कृती आणि उक्ती आत्मिक समाधान देते.
डॉ हनुमंत भोपाळे
सद्सदविवेकबुध्दीचा वापर करून केलेली कृती आणि उक्ती आत्मिक समाधान देते.
असे असताना क्षणिक सुखासाठी कधी कधी काही माणसं मोह,भय,पूर्वग्रह,सुडबुध्दीमुळे विकेकाचा बळी देऊन नको त्या कृती आणि उक्ती करतात.
असं करताना त्यांचं मन त्यांना सांगत असते,'तू जे काही करतोस ते योग्य करत नाहीस.यालाच आतला आवाज म्हणतात. तरी पण यावेळी कोणता तरी विकार अधिक उचल खातो ,विचाराचा खून होतो.विचार थोड्या काळासाठी पराभूत होतो अन् विकाराचा विजय होतो.
या विजयाचे आयुष्य फार कमी असते.
विचाराचा खून केलाय, हे लक्षात येते,ह्या लक्षात येण्याला म्हणतात प्रश्चाताप.
शरीराला आलेला ताप गोळीनं थंड होऊ शकतो पण
पश्चातापावर ही गोळी काम करु शकत नाही.
पुन्हा ही घोडचूक करायची नाही हा निर्धार घेऊन
स्वत:ला क्षमा करून ज्यांना वेदना प्रदान केली त्याची मनोभावे माफी मागितली तर पश्र्चातापरूपी ज्वर
डोकं वर काढत नाही, तो शांत होऊ लागतो.पश्चातापाचा
अग्नी तसाच ठेवून, त्याला दाबून टाकून कोणताही मनुष्य
सुखाने जगू शकत नाही.
गाढ विश्रांती घेऊ शकत नाही.अशी विश्रांती गमावलेल्या
मनुष्याच्या जगण्यात कृतार्थ नसते.उत्साह, सात्त्विक आनंद
आत्मिक बळ
निघून जाते. स्वत:च्या नजरेतून पडतो.
स्वत:च्या नजरेतून पडलेली माणसं दुस-याच्या,सद्गुणी माणसांच्या नजरेत भरत नाहीत.घरंचेही कंटाळतात,
अनेक जण टाळतात.तरी पण अशी माणसं ओढूनताणून
चार माणसात आपण सुखी असल्याचे  भासवतात.खरं ते आतून नासलेले असतात.
असलं नासलेपण दूर करण्यासाठी अहंकाराला दूर ठेवून
सत्संग, सद्भावना विधायक विचार आणि कार्याची कास धरून नम्रपणे  वाटचाल करणं सुखी जीवनाचा एक राजमार्ग ठरेल
डॉ हनुमंत भोपाळे
9767704604
hanumantbhopale@gmail.com