Sunday 22 December 2019

मनाच्या आंघोळीमुळे मन प्रसन्न होते 
    डॉ. हनुमंत भोपाळे
आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत,त्या गोष्टी जर आवडतं नसतील, आपल्या मनात त्याविषयी राग, तिरस्कार,चीड , खंत असेल तर मन मलीन होतं राहते.मग आयुष्य एक ओझं होऊन बसते.डोक्यावरचं ओझं कुणी उतरवू लागेल पण मनावरचं ओझं कोण उतरवेल? मनांवर ओझं घेऊन वाटचाल करणारी माणसं  दुःखी असल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या लवकर थकतात.मन थकले की,तनही थकून जाते.काही करावं वाटतं नाही.कुठेही मन लागतं नाही.कशातही रस वाटत नाही. याला नैराश्य असं म्हणतात.
मी थकलोय म्हटले तर सहवासातील माणसं विचारतात,'
काहीच केला नाहीस तर मग तू कसा थकलास '?
खायला काळ अन् भुईला भार झाला आहेस, असे बोलून पुन्हा त्या व्यक्तीला थकण्यासाठी इंधन दिले जाते.
मन थकले की, सगळेच थकून जाते,ही बाब लक्षात घेऊन मनाला उभारी दिली नाही, उपाययोजना केली नाही तर,ती व्यक्ती कार्यप्रवण होणं  अवघड असते.
नैराश्य हा एक मानसिक आजार आहे, हे समजून घेतले पाहिजे.
निदान झाले नसेल तर उपाय शक्य होतं नाही.योग्य समुपदेशन करून कारणांचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना केली पाहिजे.
वेगवेगळ्या तऱ्हेचे मनावरील ओझे दूर कसे करता येतील ?ओझं येणार नाही,याची खबरदारी कशी घ्यावी?याची जाण आणि ज्ञान असणं आवश्यक आहे.हे आवश्यक शिक्षण आणि प्रशिक्षण घेतले पाहिजे अन् ते मिळालेही पाहिजे.यामुळे  मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक तयार होतील.
मलाच दुःख का ? एखादं अपयश येणं,एखादी संधी हातातून जाणं, एखाद्याच्या कुचक्या बोलण्याचा वारंवार विचार करत  राहणं आदी कारणांमुळे नैराश्य येते.यातून काहीही विपरीत घडू शकते.मानसिकदृष्टया सक्षम करण्यासाठी , योग्य तो उपचार करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.
शिक्षण संस्थांतून केवळ मार्क घेऊन बाहेर पडणं अपेक्षित नाही. मनानं हरलेले आणि मार्कानं तरलेले विद्यार्थी समाजाला सक्षम करू शकत नाहीत.
मनात सलणारे प्रश्र्न ज्यांना सोडवता येत नाहीत,ती माणसं स्वत:चे व  समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी फारसे सक्षम बनू शकत नाहीत.
      गाडी हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण, शिक्षण घेतले जाते तर मग मनाला हाताळण्याचे विशेष शिक्षण आणि प्रशिक्षण का घेतले जात नाही?असे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे.
   आध्यात्मिक ज्ञान,स़ंतसमुपदेशक महात्मे,योगी,मानसशास्त्रतज्ज्ञ आदींची नितांत गरज आहे.मन कसं काम करते हे सांगणारं
,मानसशास्त्र तन कसं काम करते,हे सांगणारं शरीरशास्त्र
तन आणि मनाला एकत्र आणून मानसिक, शारीरिक स्वास्थ कसं टिकवून ठेवता येईल हे सांगणारं
योगशास्त्र   आदीं शास्त्रांचे अध्ययन केले पाहिजे.कानातलं मळ काढणं जसं आवश्यक असते तसं मनातला मळ काढण्याची नितांत गरज असते..शरीरातील नको ते काढून टाकण्यासाठी शब्दक्रियेची जशी गरज असते तशी मनातील नको त्या भावना, कल्पना आणि विचार काढून टाकण्यासाठी शब्दरूपी शस्त्रक्रियेची नितांत आवश्यकता असते.
तथागत गौतम बुद्ध,  पातंजल ऋषी,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम,स्वामी विवेकानंद,  सत्यनारायण गोयंका,श्री श्री रविशंकर जी, आदी महापुरुषांनी मनासंबंधी मांडलेल्या विचारांचे चिंतन मनन करणे उपकारक ठरते.घर रोज स्वच्छ करतो.शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतो तसं रोज मनाची आंघोळ केली पाहिजे. योगसाधना,विपस्यना,सत्संग, संगीत,शुभसंकल्प, सकारात्मक विचार, भावना आणि कल्पनेने मनाला आंघोळ घालता येते.
या आंघोळीमुळे मन प्रसन्न, आनंदी , उत्साही राहते.सक्षम बनते.मानसिक समाधान,सुख शांती लाभते.
अशा जगण्यात खरी मजा आहे.
डॉ. हनुमंत भोपाळे
9767704604

No comments:

Post a Comment