Friday 13 December 2019

मोठं होण्यासाठी एकचं क्षेत्र नसते
     डॉ. हनुमंत भोपाळे
            काहीजण एखाद्या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तिथे त्यांचा जम बसतो.ते यशस्वी होतात पण अनेक यशस्वी समजलेल्या माणसांना सुरूवातीच्या क्षेत्रात फारस काही करता आले नाही.त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली, यशस्वी झाले. त्यासाठी रस्ते बदलावे लागेल तरी हरकत नाही प्रवास थांबणार नाही असा विचार करून वाटचाल करणे आवश्यक असते.
महात्मा गांधी यांनी वकिली केली.पण ते यशस्वी वकील होऊ शकले नाहीत.पण त्यांनी राजकारणात  आपला अमीट असा ठसा उमटविला.त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र,त्यांचे लेखन जगप्रसिद्ध झाले.
       काहीजण एका विशिष्ट क्षेत्रात जावं म्हणून त्या क्षेत्रासंबंधी पदवी घेतात.पण त्यांना मध्येच वाटते की, नाही आपण दुसऱ्या क्षेत्रात गेलं पाहिजे .त्या क्षेत्रात आपण चांगले काम करू शकतो, एवढेच नाही तर आनंदाने जगू शकतो म्हणून जातात.तिथे चांगली छाप निर्माण करतात.जिल्हाधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले श्रीकर परदेसी ह्यानी वैद्यकीय शिक्षण घेऊन पदवी मिळवली.ते डॉक्टर म्हणून काम न करता स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी सनदी अधिकारी झाले. डॉ.श्रीराम लागू देखील डॉक्टरची पदवी घेतली पण त्यांनी आपली चमक कला क्षेत्रात दाखवली.अनेक चित्रपटातील त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली.नटसम्राट नाटकाला त्यांच्या भूमिकेनं अजरामर केले अन् तेही अविस्मरणीय ठरले.
  काही माणसं एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरले. पण दुसऱ्या क्षेत्रात कमालीचे यशस्वी झाले.
सचिन तेंडुलकर हे क्रिकेट क्षेत्रात देव मानले गेले, त्यांना शैक्षणिक यश मात्र मिळवता आले नाही.म्हणून काही ते अपयशी ठरत नाहीत.एखादी लढाई हरवली म्हणजे दुस-या लढाईतही पराभूत होतो असे काही नसते. काही लढाया हरूनही  युद्ध जिंकता येते.
 अनेक यशस्वी ठरलेल्या माणसांना अनेकदा पराभवाचे तोंड पाहावे लागेल आहे.एखाद्या क्षेत्रातील माघार,त्या क्षेत्रातील अपयश म्हणजे संपूर्ण जीवन अपयशी असे काही नसते.एखाद्या वेळी पराभूत होणे ही बाब वाईट नाही तर पराभूत मानसिकतेत जगणं लाजिरवाणे ठरते.भिका-याच्या भूमिकेत जगून राजा होता येतं नाही.अडवल्याने,थोडा वेळ थांबल्याने माणसं लहान ठरत नाहीत तर उमेद गमावून बसून नकारात्मक विचार करून आता काहीच करायचे नाही.हरी हरी करत राहावं.लोक हरामखोर आहेत.उपकारीची जाणीव ठेवत नाही.कपटी आहेत.काहीजण तर उपकाराची परतफेड अपकाराने करतात.कसं सहन करावे.काहीजण
दुतोंडी , विश्र्वास घातकी आहेत. कुणासाठी काहीही आणि कितीही काम करुनही चांगली फळे मिळायचे तर सोडाच पण वाईट अनुभव आले.ज्यांना जीव लावला ती माणसं जीव घेण्याचा विचार करतात ,ही अतिशय वेदनादायी बाब आहे.आता या पुढे काहीच करायचे नाही म्हणून सेवा,काम, चांगुलपणा सोडून देऊन आपल्याच कोशात गुंग होणं फार मोठं अपयश आहे.थोडी माघार घेतली तरी काही हरकत नाही ;पण  क्षमता, कौशल्य, शहाणपण आणि नवं काही तरी करून दाखवायचे वय असताना कायम स्वरूपी थांबण्याच्या निर्णय हा आत्मघातकी निर्णय ठरतो. पराभव, फसवणूक, वाईट अनुभवाना पचवून,त्यावर मात करून त्याचं किंवा अन्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली तरी यशाचा डंका वाजवता येतो,हे अनेकांनी दाखवून दिले आहे.घरात अनेक दिवसांपासून असलेला अंधार उजेड निर्माण करताच निघून जातो तसं यशात अपयश पुसून टाकण्याची शक्ती आहे.अब्राहम लिंकन हे अनेक निवडणूका हरत गेले.शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.
अपयशाला यशात रूपांतर करण्याची हिंमत आणि हिकमत ज्यांच्या ठिकाणी आहे ती माणसं यशोगाथा निर्माण करतातच,हे अनेकांनी दाखवून दिले.यशोगाथा तयार होऊ लागल्या की,माथा टेकवायला माणसं तयार आहेतच.लपून छपून वार करणारे, अंगात वारं भरल्या सारखं विरोधात बोलणारे  अनेकजण पुष्पहार घेऊन तयार राहतील . उघड वार करणारेही कौतुक करतील.त्यामुळे बदल घडतच नाही असा विचार न करता बदल घडतोच अन् पहा तसा बदल घडवून दाखवतोय असा विचार करून वाटचाल केल्यास नक्कीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात चांगले यश मिळते.
डॉ. हनुमंत भोपाळे
9767704604

No comments:

Post a Comment